सांगली : जिल्ह्यात आजपासून (११ ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सांगली पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. संपूर्ण सांगली जिल्ह्यात डॉल्बी, डीजे, अतिउच्च क्षमतेचे ध्वनिक्षेपक तसेच डोळ्यांना इजा पोहोचवणाऱ्या लेझर आणि बीम लाईट्सच्या वापरावर २१ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
नवरात्रोत्सवातील आगमन मिरवणुका, रास दांडिया, गरबा आणि दसऱ्याच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. हे निर्बंध ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाले असून, २१ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील.
‘या’ वाद्य आणि लाईट्सवर पूर्ण निर्बंध
पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशानुसार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर किंवा कोणत्याही कार्यक्रमात खालील उपकरणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे:
- ध्वनियंत्रणा: डॉल्बी, डॉल्बीसारखी वाद्ये, डीजे आणि अतिउच्च क्षमतेचे ध्वनिक्षेपक (साऊंड सिस्टिम).
- प्रकाशझोत (लाईट्स): प्लाझमा लाईट, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्पी आणि प्रेशरमिड लाईट्स. (या प्रकाशझोतांच्या दुष्परिणामांमुळे डोळ्यांना धोका संभवतो.)
- जबाबदारी: मंडळांचे पदाधिकारी, आयोजक, कार्यकर्ते यांसह साऊंड सिस्टिम व लेझर लाईट्सचे मालक आणि चालकांवरही या नियमांचे पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीत ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी वणवण; 41 गावांना 39 टँकरचा आधार, जतमध्ये परिस्थिती सर्वाधिक बिकट.
मोर्चे, मिरवणुका आणि सभांसाठी परवानगी बंधनकारक
सध्या नवरात्रोत्सवासह जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग, एस.आय.आर., पेपरफुटी, ऊसदर, स्मार्ट मीटर आणि घरपट्टीवाढ विरोधी विविध आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून मोर्चे, मिरवणुका, निदर्शने किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३६ अन्वये हे अधिकार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आयोजकांनी वेळ, मार्ग, सभेचे ठिकाण आणि गर्दी याविषयी ठाणे प्रमुखांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३४ अंतर्गत कारवाई केली जाईल.
हेही वाचा: आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर सांगलीत सोन्या-चांदीचे दर किती? खरेदीपूर्वी तपासा आजचे भाव.




