सांगली टुडे वृत्तसेवा: राज्यात परतीच्या पावसाने निरोप घेतल्यानंतर ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कमालीचा वाढला असतानाच, ऐन दसऱ्याच्या दिवशी हवामानात अचानक मोठा बदल पाहायला मिळत आहे. कडक ऊन आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच दसऱ्याच्या सणोत्सवात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज मंगळवारी (२० ऑक्टोबर २०२६) सांगली, कोल्हापूर, सातार्यासह राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, या जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
दुपारी कडक ऊन, संध्याकाळी विजांचा कडकडाट
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. सोलापूर, यवतमाळ आणि अमरावती या भागांत तापमान ३७ ते ३८ अंशांवर पोहोचले असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर दमट वातावरणामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.
पुण्यात काल संध्याकाळी अचानक ढग दाटून येत हडपसर, येरवडा आणि पिंपरी-चिंचवड भागात विजांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अशीच परिस्थिती आज पश्चिम महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि दुपारी कडक ऊन पडल्यानंतर दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
या जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील हालचालींमुळे खालील भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे:
- पश्चिम महाराष्ट्र: सांगली, कोल्हापूर आणि सातारा.
- कोकण विभाग: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.
- मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर आणि लगतच्या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होऊ शकतो.
उर्वरित महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागात मात्र आकाश मुख्यत्वे निरभ्र राहील, तसेच दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.
सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी आणि सोयाबीन मळणीची कामे वेगाने सुरू आहेत. दुपारनंतर स्थानिक पातळीवर अचानक ढग जमा होऊन विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेतातील काढलेले धान्य आणि पिके सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावीत.
शेती, बाजारभाव आणि हवामानाचे ताजे अपडेट्स मोबाईलवर मिळवण्यासाठी ‘महाराष्ट्र अपडेट्स’ व्हॉट्सॲप चॅनेल नक्की फॉलो करा. 👉 चॅनेल फॉलो करा.




