सांगली टुडे वृत्तसेवा: दसऱ्यानंतर राज्यातील हवामानात मोठे बदल होत असून, सध्या नागरिक एकाच वेळी तीव्र उष्णता आणि पावसाच्या अनिश्चिततेचा सामना करत आहेत. नवरात्रोत्सवात परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढू लागला आहे. दुपारच्या वेळेस वाढणारे तापमान आणि हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा कमालीचा वाढला आहे. मात्र, याच दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलांमुळे काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या किनारपट्टीच्या भागात सध्या दमट आणि उष्ण हवामान जाणवत असून नागरिकांचा घामाघूम प्रवास सुरू आहे. हवामान विभागाने या पट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरणाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण किनारपट्टीच्या जिल्ह्यांत दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता बहुतांश ठिकाणी कडक ऊन पडत आहे. सोलापूर, सांगली आणि सातारा या भागांत उन्हाचा पारा चांगलाच तापला आहे. तरीही सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आणि लगतच्या भागात स्थानिक वातावरणामुळे पावसाची शक्यता कायम आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भागांत पुढील २४ ते ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावू शकतात. ऐन सुगीच्या दिवसांत आणि सणासुदीच्या तोंडावर हा लहरी पाऊस पडल्यास सोयाबीन काढणी, रब्बीची पेरणी आणि फळबागांच्या कामांना फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र परिस्थिती पूर्णपणे कोरडी आणि उष्ण राहण्याचा अंदाज आहे. नाशिक, जळगाव, धुळे या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता नसून कोरडे हवामान राहील. येथे दिवसाचे कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे जात असल्याने उन्हाचा चटका तीव्र जाणवत आहे. एकंदरीत, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात संमिश्र हवामान राहणार असून, दुपारच्या वेळी तीव्र उकाडा आणि काही ठिकाणी संध्याकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



