सांगली (सांगली टुडे न्यूज नेटवर्क): सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेशी संलग्नित असलेल्या महिला बचत गटांतील सदस्यांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त विशेष गरबा आणि दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्या संकल्पनेतून शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता सांगली येथील काळी खण चौपाटीवर हा कार्यक्रम पार पडणार आहे.
कष्टकरी महिलांना सणाचा आनंद घेता यावा आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
काळी खण चौपाटीवर महिला सक्षमीकरणाचा उपक्रम
सांगलीतील काळी खण परिसराचे सुशोभीकरण करून महापालिका प्रशासनाने तिथे चौपाटी विकसित केली आहे. या चौपाटीवर महिला बचत गटांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सुरू करण्यास जागा देण्यात आली आहे. चौपाटीला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आता याच ठिकाणी नवरात्रीचे औचित्य साधून महिलांसाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे.
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी प्रत्यक्ष जागेवरच गरबा आणि दांडिया नृत्याचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘ग्लो विथ दिपाली इन्स्टिट्यूट’च्या संचालिका दिपाली यादव या उपस्थित महिलांना गरब्याच्या विविध स्टेप्सचे प्रशिक्षण देणार आहेत.




