सांगली (सांगली टुडे विशेष प्रतिनिधी): राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सांगली जिल्ह्याने वर्चस्व निर्माण केले आहे. वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथील ‘मोरया सार्वजनिक गणेश मंडळा’ने संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच जिल्हास्तरावर विटा आणि खरसुंडी येथील मंडळांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. शासनाने गुरुवारी (१५ ऑक्टोबर) या स्पर्धेचा अधिकृत निकाल जाहीर केला.
शासनाकडून गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत असून पर्यावरणपूरक मूर्ती, सामाजिक उपक्रम, शिस्त आणि देखाव्यांच्या मूल्यांकनावर ही स्पर्धा पार पडली. १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर छाननी करून एकूण १४१ मंडळांची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विजेती मंडळे:
- राज्य व जिल्हा पातळीवर प्रथम: मोरया गणेश मंडळ (येडेनिपाणी, ता. वाळवा)
- जिल्हा पातळीवर द्वितीय: तिरंगा गणेशोत्सव मंडळ (विटा, ता. खानापूर)
- जिल्हा पातळीवर तृतीय: नाथ युवा असोसिएशन (खरसुंडी, ता. आटपाडी)
आज मुंबईत गौरव सोहळा: या स्पर्धेतील सर्व मानकरी मंडळांना आज शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात मान्यवरांच्या हस्ते अधिकृतपणे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील गणेश मंडळाने राज्यपातळीवर अव्वल क्रमांक पटकावल्याने वाळवा परिसरासह संपूर्ण सांगली जिल्ह्यातून मंडळाचे कौतुक होत आहे.




