सांगली : खानापूर तालुक्यातील घटलेली भूजल पातळी आणि अपुऱ्या पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वन विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. तालुक्यातील वनक्षेत्रातील नैसर्गिक पाणीस्रोतांवर लोकसहभाग आणि श्रमदानातून तब्बल २२५ वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आतापर्यंत २८ वनराई बंधारे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत.
खानापूर-विटा वनक्षेत्रपाल विलास पवळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या निर्देशानुसार, उपवनसंरक्षक (प्रा.) सागर गवते व सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
साखळी पद्धतीने बंधाऱ्यांची उभारणी
खानापूर तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, मातीतील ओलाव्याचे घटते प्रमाण आणि भूजल पुनर्भरण क्षमतेतील घट यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार वनक्षेत्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी साखळी पद्धतीने (Chain System) ठराविक अंतरावर हे वनराई बंधारे उभारले जात आहेत.
२० हून अधिक गावांच्या हद्दीत काम सुरू
या उपक्रमात वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांच्यासोबतच शालेय विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने श्रमदान करत आहेत. खानापूर तालुक्यातील खालील गावांच्या वनक्षेत्रातील नैसर्गिक ओढ्यांवर आणि पाणीस्रोतांवर हे बंधारे बांधण्यात येत आहेत:
- सुळेवाडी, पारे, घोटी बुद्रुक, खंबाळे, भिकवडी बुद्रुक
- वाळुज, रेवणगाव, वासुंबे, धोंडगेवाडी, मादळमुठी
- देविखिंडी, लेंगरे, जाधववाडी, करंजे, पोसेवाडी
- घोटी खुर्द, ऐनवाडी, मेंगाणवाडी, हिवरे, ताडाचीवाडी आणि बाणूरगड
जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन
बदलत्या हवामानामुळे जमिनीत पाणी मुरवणे आणि मातीची धूप थांबवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या तात्पुरत्या स्वरूपाच्या वनराई बंधाऱ्यांमुळे ओढ्यांमधील पाण्याचा प्रवाह थांबून भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी व शेतकऱ्यांनी श्रमदानात सहभागी व्हावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.




