सांगली टुडे वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ऑक्टोबर हिटमुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच आता वातावरणात वेगाने उलथापालथ सुरू झाली आहे. गोव्यात कोसळलेल्या वादळी पावसानंतर आता महाराष्ट्रातही पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. बंगालच्या उपसागरात आकारास येत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा ढगांची दाटी पाहायला मिळणार असून, काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वेगाने सक्रिय होत आहे. येत्या २४ ते ४८ तासांत ही प्रणाली अधिक तीव्र होऊन तिचे रूपांतर संभाव्य चक्रीवादळात होण्याची दाट शक्यता आहे. ही वादळी प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकत आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल करेल. महाराष्ट्राला या चक्रीवादळाचा थेट तडाखा बसणार नसला, तरी जमिनीवरील वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
२७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस?
या हवामान बदलाचा सर्वात मोठा प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्यावर दिसून येण्याची शक्यता आहे. साधारण २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान या दोन्ही विभागांत ढगाळ वातावरण राहून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर हा पाऊस होत असल्यामुळे काही ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीला फायदा होऊ शकतो, तर काही भागात उघड्यावर असलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. चक्रीवादळाचा प्रत्यक्षात मार्ग काय राहतो, यावर पावसाची नेमकी तीव्रता अवलंबून असेल.
आज पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काय परिस्थिती?
राज्यात एकीकडे मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात दमट हवामान आणि असह्य उकाडा कायम असला, तरी दक्षिण भागात मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील काही भागांत मेघगर्जनेसह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून पावसाच्या सरी कोसळू शकतात. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मच्छिमारांना पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा: 👉 ऊस शेतीत AI ची एन्ट्री: सांगलीत दुष्काळावर मात करत ‘एकरी १५० टन’ उत्पादनाचा नवा पॅटर्न; पाहा कृषी विभागाचे मार्गदर्शन.



