सांगली: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत थकीत शेती कर्जाची माहिती शासनाच्या पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका आणि व्यापारी बँकांमधील थकीत कर्जदार असलेल्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी संबंधित विकास सोसायटी किंवा बँक शाखेत आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.
याशिवाय, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप AgriStack Registration केलेले नाही, त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करून त्याचा नोंदणी क्रमांक संबंधित विकास सोसायटी व बँकेकडे सादर करावा. तसेच, विकास सोसायटीकडे आधार कार्ड जमा न केलेल्या सभासदांनीही आधार तातडीने जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वारसांनी आधार कार्ड, वारसांचे संमती प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँक किंवा प्राथमिक विकास संस्थेशी संपर्क साधावा. शासनाने निश्चित केलेली प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
त्यामुळे कर्जमाफीस पात्र असलेल्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी कोणताही विलंब न करता KYC, AgriStack नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




