सांगली: 21 जून रोजी होणारी NEET-UG फेरपरीक्षा सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रांवर एकूण 4,572 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी संबंधित विभागांचा आढावा घेत सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार, अफवा किंवा अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क राहणार आहे.
प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीपासून ते परीक्षा संपेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून उमेदवारांची ओळख पडताळणी आणि सुरक्षा तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे.
पूर्वतयारी बैठकीत परीक्षा केंद्रांवरील मूलभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. सर्व केंद्रांवर परीक्षा शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी परीक्षा केंद्र परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच वाहतूक नियंत्रण आणि संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: कर्नाटकला कत्तलीसाठी नेत असताना 5 खिल्लार बैलांची सुटका; बोलेरो पिकअपसह कारवाई.




