सांगली : कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) सांगली महानगरच्या वतीने शहरात ३०० फूट तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कारगिल युद्धातील वीर जवानांना अभिवादन केले.
विश्रामबाग येथील हनुमान मंदिर परिसरातून भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून पदयात्रेला प्रारंभ झाला. सहभागी युवकांनी हातात ३०० फूट लांबीचा तिरंगा घेत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.
ही पदयात्रा विश्रामबाग येथून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे पुन्हा हनुमान मंदिर परिसरात दाखल झाली. मार्गावरील विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून सहभागींचे स्वागत केले तसेच तिरंग्याला मानवंदना देत भारतीय सैन्याच्या पराक्रमाला सलाम केला.
यावेळी बोलताना आयोजकांनी कारगिल विजय दिन हा भारतीय सैनिकांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि सर्वोच्च बलिदानाची आठवण करून देणारा दिवस असल्याचे सांगितले. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशसेवेची भावना दृढ व्हावी, हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला आमदार सुधीर गाडगीळ, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वाती खाडे, सामाजिक कार्यकर्ते जयदीप पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच अभाविपचे जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. जान्हवी बेडेकर, जिल्हा संयोजक केतन शेंडगे, महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. सिद्धेश्वर जाधव, महानगर मंत्री अविनाश यादवाडे, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.




