सांगली : विट्याजवळील रेणावी घाटात दोन एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. शुक्रवारी उपचारादरम्यान १७ वर्षीय साक्षी चंद्रकांत पवार या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्चही शासनाकडून केला जाणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली.
विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी हा अपघात झाला. विटा आगाराची विटा-भिवघाट बस आणि मेढा आगाराची विजापूर-मेढा बस रेणावी घाट परिसरात धडकल्या. या दुर्घटनेत खानापूर येथील नंदा हरिदास त्र्यंबके (६०) आणि बांबवडे येथील धोंडिराम लक्ष्मण पाटील (७८) यांचा जागीच मृत्यू झाला होता.
अपघातात एकूण ३८ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. उपचार घेत असलेल्या साक्षी पवार हिची शुक्रवारी सकाळी प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. ती खानापूर तालुक्यातील ऐनवाडी येथील रहिवासी असून बळवंत महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.
अपघातातील सात गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सांगली, कऱ्हाड आणि कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. तर १५ जखमींवर विट्यात उपचार सुरू असून त्यापैकी नऊ जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
दरम्यान, मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची आर्थिक मदत आणि जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनाकडून करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्याची माहिती देण्यात आली आहे. या मदतीसाठी आमदार सुहास बाबर यांनी पाठपुरावा केला होता.




