सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडून (सुप्रीम कोर्ट) मोठा दिलासा मिळाला आहे. जत तालुका विकास सोसायटी गटातून दाखल केलेला पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवणारा कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असून, त्यांचा उमेदवारी अर्ज पूर्णपणे वैध ठरवला आहे.
यापूर्वी कोल्हापूर सर्किट बेंचने याचिकाकर्त्यांचे आक्षेप ग्राह्य धरत पडळकर यांचा अर्ज बाद ठरवण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
सर्वोच्च न्यायालयात पडळकर यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि ॲड. आनंद लांडगे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश बाजूला सारत पडळकर यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निर्णय दिला.
या निकालानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली. “हा सत्याचा आणि न्यायाचा विजय आहे. सर्वोच्च न्यायालयाने माझा उमेदवारी अर्ज वैध ठरवून कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश रद्द केला आहे,” असे पडळकर म्हणाले.
सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर आटपाडी आणि जत परिसरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.




