Sangli News | जत : जत शहरात शुक्रवारी सकाळी एका 23 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. उमदी (ता. जत) येथील रहिवासी विकास मलकारी टकले याचा मृतदेह जनावर बाजार समितीच्या आवारात विवस्त्र अवस्थेत आढळून आला. यात्रेच्या धावपळीत घडलेल्या या घटनेमुळे जत शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विकास टकले गुरुवारी आपल्या आजारी आई तीर्थाबाई यांना उपचारासाठी जत येथील खासगी रुग्णालयात घेऊन आला होता. आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो ‘देवीच्या दर्शनाला जाऊन परततो’ असे सांगून बाहेर पडला. गुरुवारी सायंकाळी तो आरळी कॉर्नर परिसरात नातेवाईकांना दिसला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही.
शुक्रवारी सकाळी जनावर बाजार समितीच्या आवारात एका तरुणाचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासानंतर हा मृतदेह विकास टकले याचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या वेळी रुग्णालयात आई व बहिणीचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.
या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि जत पोलिसांची दोन स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून, फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत.
दरम्यान, मृत विकासच्या कुटुंबीयांनी भावकीतील जुना जमिनीचा वाद या खुनामागील कारण असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या दहा वर्षांपासून उमदी येथील सुमारे सात एकर जमिनीचा वाद सुरू असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या आरोपांच्या अनुषंगाने पोलिस तपास सुरू असून, खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










