Miraj News | मिरज : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने संघटनात्मक पातळीवर मोठी हालचाल करत मिरजेत भव्य पक्षप्रवेश मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह अनेक माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना संबोधित करत विकासकेंद्री राजकारणावर भर दिला. नेतृत्वाकडे स्पष्ट दृष्टीकोन, कामाची इच्छाशक्ती आणि सर्वसमावेशक विचार असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. जाती-पातीच्या राजकारणापेक्षा माणुसकी, विकास आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मिरजच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही
अजित पवार यांनी मिरज शहरातील मीरासाहेब दर्ग्याच्या सर्वांगीण विकासासाठी टप्प्याटप्प्याने १५३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या निधीतून पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामान्य नागरिकांचा आवाज शासनापर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी पक्षाची वैचारिक भूमिका स्पष्ट करत सांगितले की, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. नवीन नेतृत्वाला संधी देणे, कार्यकर्त्यांना पुढे आणणे आणि सामान्य नागरिकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे हे पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि सर्व समाजघटकांच्या विकासासाठी पक्ष कटिबद्ध असून, शेती, शिक्षण, कौशल्य विकास, तीर्थक्षेत्र विकास तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनेक दिग्गजांचा सहभाग
या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे, करण जामदार, जुबेर चौधरी, आरिफ चौधरी, अंकुश कोळेकर, शुभांगी देवमाने, नर्गिस सय्यद, मालन हुलवान, रेखा विवेक कांबळे, बिलकिस बुजरूक शेख, चंद्रकांत हुलवान, आजम काझी, शरद जाधव, शकील पिरजादे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशमुळे मिरज शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाची ताकद वाढल्याचे स्पष्ट चित्र असून, याचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: सांगलीत पूर्व वैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या; संशयित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










