मिरज : एसटी वाहकाला मारहाण होत असताना मध्यस्थी करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर दोघांनी धारदार हत्याराने हल्ला केल्याची गंभीर घटना मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर घडली. या हल्ल्यात कोंडीबा सरगर हे पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून जालना येथे जाणारी एसटी बस छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून जात होती. मार्केट यार्ड परिसरातून आलेल्या दोघांशी एसटी वाहकाचा वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
याच वेळी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कोंडीबा सरगर तेथून जात होते. रस्त्यावर सुरू असलेला गोंधळ पाहून त्यांनी हस्तक्षेप करत संबंधितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांनी सरगर यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरगर यांना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.




