सांगली : राज्यातील लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांविषयी एक मोठा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार तब्बल दीड कोटी बहिणी अपात्र ठरल्या असून, त्यांचे हप्ते थांबवण्यात आल्याची माहिती पसरवली जातेय. सांगली जिल्ह्यात तर सुमारे २५ टक्के लाभार्थ्यांचे अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. या चर्चेमुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
काय आहे व्हायरल मेसेज?
सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत २ कोटी ६३ लाख लाभार्थी नोंदले गेले होते. सध्या पोर्टलवर ही संख्या केवळ १ कोटी ६ लाख असल्याचे दिसते. सांगली जिल्ह्यातील सव्वा ७ लाख लाभार्थ्यांपैकी २५ टक्के महिला अपात्र ठरल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांनी लाडकी बहीण योजनेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अधिकृत पडताळणी काय सांगते?
महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, दीड कोटी लाभार्थी अपात्र ठरलेत हा दावा चुकीचा आहे.
पोर्टलवरील माहिती ही गेल्या वर्षीची असून, ती अद्ययावत नव्हती.
सध्या लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची संख्या २ कोटी ३० लाखांपेक्षा अधिक आहे.
पडताळणीत काही अर्जांत त्रुटी आढळल्याने काही अर्ज अपात्र करण्यात आलेत, मात्र मोठ्या प्रमाणात लाभार्थी कमी झाल्याचा दावा चुकीचा आहे.
व्हायरल मेसेजमुळे निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. लाडकी बहीण योजना अद्याप राज्यातील लाखो महिलांना लाभ देत आहे. दीड कोटी लाभार्थी अपात्र ठरल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: कवठेमहांकाळ डॉक्टरांकडून एक कोटींचा ऐवज लंपासप्रकरणी महिलेसह दोघांना अटक.