मुंबई (सांगली टुडे वृत्तसेवा) : सध्या दसरा आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बळीराजासाठी सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन दसऱ्याच्या मुहूर्तावर १ लाख रुपयांची आर्थिक मदत बँक खात्यात जमा करणार असल्याचा दावा व्हॉट्सॲप, युट्यूब आणि सोशल मीडिया ग्रुप्सवर वेगाने पसरवला जात आहे. मात्र, हा दावा शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असून यामागील खरी वस्तुस्थिती आता समोर आली आहे.
सोशल मीडियावर नेमका काय दावा केला जातोय?
व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, दसऱ्याच्या मुहूर्तावर शेती अवजारे खरेदीसाठी किंवा सणासुदीची विशेष मदत म्हणून पंचायत समिती व शासनामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख रुपये जमा केले जाणार आहेत. काही सोशल मीडिया पेजेस आणि रील्सवर याला सरकारी योजनेचे स्वरूप देऊन सनसनाटी पद्धतीने सादर केले जात असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
‘१ लाख रुपयां’च्या दाव्यामागचे सत्य काय?
शासकीय पातळीवर उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट १ लाख रुपये जमा करण्याचा असा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. तसेच यासंदर्भात कोणताही अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला नाही.
राज्यात पिकांच्या नुकसानीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी विविध शेतकरी संघटना आणि नेत्यांकडून सातत्याने केली जात होती. मात्र, नेत्यांनी केलेली मागणी आणि शासनाने प्रत्यक्ष मंजूर केलेली मदत यात मोठा फरक आहे. याच मागणीचा संदर्भ घेऊन काही घटकांनी “शासनाने १ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला” अशा खोट्या अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे.
अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा
सध्या शासनामार्फत पीक नुकसान भरपाई, नियमित कर्जफेडीचे प्रोत्साहनपर अनुदान आणि नियमित योजनांचे हप्ते थेट बँक खात्यात पाठवले जातात. मात्र १ लाख रुपयांच्या मदतीचा मेसेज पूर्णपणे बिनबुडाचा आहे. त्यामुळे अशा व्हायरल मेसेजवर किंवा अनोळखी लिंक्सवर शेतकऱ्यांनी अजिबात विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही अनोळखी फॉर्मवर आपली वैयक्तिक अथवा बँक खात्याची माहिती भरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.




