सांगली टुडे वृत्तसेवा: राज्यात हवामानाचे दोन परस्परविरोधी चेहरे पाहायला मिळत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात राज्यात थंडीची चाहूल लागण्याऐवजी उन्हाचे चटके आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. मुंबईसह बहुतांश जिल्ह्यांत दिवसा कडक ऊन आणि असह्य उकाडा जाणवत असतानाच, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, त्याचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीचा मोठा प्रभाव दक्षिण भारतातील तमिळनाडू आणि केरळ राज्यांवर दिसून येत असून तिथे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे कोणतेही थेट संकट नसले, तरी बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यातील स्थानिक वातावरणात वेगाने बदल होत आहेत.
मुंबई, ठाणे व उपनगरांत घामाच्या धारा
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड पट्ट्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि प्रचंड आर्द्रता (Humidity) जाणवत आहे. कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे जात असल्याने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही आकाश निरभ्र राहून कोरडे हवामान राहणार असल्याने तिथेही उष्णतेची तीव्रता कायम राहील. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिक परिसरातही हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या सरींची शक्यता
उष्णतेच्या या लाटेत तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मात्र पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. याशिवाय कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांचे घाटमाथे आणि सांगली जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह हलक्या सरी कोसळू शकतात. हा पाऊस सर्वदूर नसून ठरावीक पट्ट्यांपुरताच मर्यादित राहील, असे हवामान तज्ज्ञांनी नमूद केले आहे. अचानक येणाऱ्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणीला आलेल्या शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: दिवाळी पाडव्याला सोने खरेदी करणार आहे? मग या ५ गोष्टी नक्की तपासा; एक छोटीशी चूकही पडू शकते महागात!.



