सांगली: दिवाळी सणात गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, सांगली एसटी विभागाने विशेष नियोजन केले आहे. जिल्ह्यातील १० आगारांतून सुमारे ८० जादा बसेस सोडण्यात येत असून, ही सुविधा आज, २ नोव्हेंबरपासून २२ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध राहील. गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एकट्या भाऊबीजेच्या दिवशी सुमारे ५० जादा बसेस रस्त्यावर उतरवण्यात येणार आहेत.
ऐन सणासुदीत पुणे, मुंबईसह मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. यासाठी सांगली मध्यवर्ती बसस्थानकातून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि अमरावतीसाठी २० जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त मिरज, जत, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव, शिराळा, आटपाडी, विटा आणि ईश्वरपूर या सर्व तालुका आगारांमधून प्रवाशांच्या सोयीनुसार जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर, कोल्हापूर आणि बारामती मार्गावरही जादा फेऱ्या धावणार आहेत.
पुण्यासाठी कऱ्हाड-सातारा बायपासने धावणार ३ ई-बसेस
स्वारगेट (पुणे) मार्गावरील प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून सांगली आगारातून १ नोव्हेंबरपासून तीन वातानुकूलित ई-बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्या कऱ्हाड व सातारा शहरात न जाता थेट बायपास मार्गाने धावणार आहेत. सांगलीतून या बसेस सुटण्याच्या वेळा सकाळी ९:३०, दुपारी २:३० आणि दुपारी ३:३० अशा निश्चित करण्यात आल्या असून, स्वारगेट येथे पोहोचल्यानंतर या बसेस लगेच सांगलीसाठी परतीच्या प्रवासाला निघतील. प्रवाशांची गर्दी पाहून गरजेनुसार बसेसच्या संख्येत आणखी वाढ करण्यात येणार आहे.



