सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): “दादा, मी बोलतोय… गाडीचा अपघात झालाय, आत्ताच मला दवाखान्यात आणलय. डॉक्टर लगेच पैसे भरायला सांगतायत, कोणाला काही सांगू नकोस, लवकर पैसे पाठव…” फोनवर आपल्याच भावाचा किंवा मुलाचा तो रडवेला आवाज ऐकला, की कोणाच्याही काळजात धस्स होणारच. समोर आपला माणूस मोठ्या संकटात सापडलाय या एकाच विचाराने माणूस पूर्ण घाबरून जातो आणि मागचा-पुढचा कसलाही विचार न करता खात्यातले पैसे समोरच्या नंबरवर पाठवतो. पण थोड्या वेळाने जेव्हा त्या भावाला किंवा मुलाला फोन लागतो आणि तो मजेत कॉलेजमध्ये किंवा कामावर असतो, तेव्हा कळत की बँक खात्यातले कष्टाचे पैसे क्षणात गायब झालेत. फोनवर बोलणारा तो आपला माणूस नव्हताच, तर चक्क त्याचा आवाज काढून गंडा घालणारा भामटा होता! सध्या राज्यात अशाच ‘एआय व्हॉईस क्लोनिंग’च्या नव्या फसवणुकीचे प्रकार वाढले असून, महाराष्ट्र सायबर विभागाने राज्यातील जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
आता प्रश्न पडतो की या चोरांकडे आपल्या माणसाचा हुबेहूब आवाज येतो कुठून? तर याच उत्तर आहे आपण रोज मोबाईलवर वापरत असलेले फेसबुक, इन्स्टाग्राम, सोशल मीडिया. आपण सगळेच सोशल मीडियावर आपले व्हिडिओ, रील किंवा ऑडिओ पोस्ट करत असतो. सायबर भामटे नेमक याच गोष्टीवर टपून बसलेले असतात. तुमच्या व्हिडिओमधून तुमचा पाच-दहा सेकंदांचा आवाज चोरला जातो आणि Ai च्या मदतीने त्याची हुबेहूब डिजिटल नक्कल तयार केली जाते. आवाजातला तोच जडपणा, तीच बोलण्याची पद्धत इतकी खरी वाटते, की फोनवर ऐकणाऱ्याला काडीचाही संशय येत नाही.
हा सगळा डाव माणसाच्या मनात भीती निर्माण करून साधला जातो. फोन आल्यावर भामटे समोरच्याला श्वास घ्यायलाही वेळ देत नाहीत. “मोठा अपघात झालाय, पोलीस केस झाल्या, डॉक्टर ॲडमिट करून घेईना झालेत” असल बोलून माणसाची विचार करण्याची ताकदच संपवून टाकली जाते. त्यात पुन्हा “आई-बाबांना सांगू नकोस, ते जास्त घाबरतील, लवकर पैसे पाठव” असा भावनिक दबाव आणला जातो. गोंधळात पडलेला माणूस सत्य न तपासता त्यांनी दिलेल्या नंबर, Upi id वर पैसे पाठवतो आणि तिथेच तो पूर्णपणे लुटला जातो.
अशा वेळी स्वतःला आणि कष्टाच्या पैशाला वाचवायचा एकच सोपा मार्ग आहे, तो म्हणजे काहीही झाल तरी आधी शांत राहणे. अनोळखी नंबरवरून रडत-ओरडत कोणाचाही फोन आला, तरी लगेच पैसे पाठवू नका. आधी तो फोन कट करा. त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या त्या नातेवाईकाच्या नेहमीच्या नंबरवर स्वतः फोन लावून खात्री करा. जर त्याचा फोन लागत नसेल, तर त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांना किंवा शेजाऱ्यांना फोन लावा. अगदीच शंका वाटली, तर फोनवरच्या माणसाला अशी एखादी गोष्ट विचारा, जी फक्त आपल्या नातेवाईकालाच माहीत असू शकते.
एवढ करूनही जर चुकून कोणाचे पैसे गेलेच, तर घाबरून न जाता लगेच हालचाल करा. घटना घडल्यापासून पहिले दोन-तीन तास अत्यंत महत्त्वाचे असतात. खात्यातून पैसे कट होताच क्षणाचाही उशीर न करता केंद्र सरकारच्या १९३० (1930) या मोफत सायबर हेल्पलाईन नंबरवर फोन करा. वेळीच फोन केला तर ते पैसे भामट्यांच्या खात्यात जाण्यापासून लगेच गोठवले जातात.
तसेच, महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत https://mhcyber.gov.in/report-complaint या संकेतस्थळावर जाऊन घरबसल्या ऑनलाईन तक्रार नोंदवा. या पोर्टलवर विशेषतः आर्थिक फसवणुकीच्या (Financial Fraud) तक्रारींवर पोलीस यंत्रणेकडून तातडीने कारवाई केली जाते. याशिवाय इतर कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी ११२ आणि महिलांच्या सुरक्षेसाठी १८१ हे क्रमांक उपलब्ध आहेत. बदलत्या काळात फसवणूक करणारे हुशार झाले असले, तरी फक्त एका मिनिटाची खात्री आणि थोडीशी सावधगिरी आपल्याला मोठ्या नुकसानीपासून सहज वाचवू शकते.



