सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मुळे (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) राज्यातील महिलांची बचत वाढली असून घरातील पैशांच्या निर्णयांत त्यांचा सहभागही वाढला आहे. मात्र, या पैशांतून महिलांना स्वतःचा एखादा छोटा उद्योग किंवा नवे उत्पन्नाचे साधन उभे करण्यात अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही, असे एका नव्या पाहणीतून समोर आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) मदतीने नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) केलेल्या सविस्तर सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे.
१,५०० रुपयांचे नेमके गणित काय? सरासरी फक्त ४४ रुपये व्यवसायावर खर्च
या अहवालानुसार, लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या दरमहा १,५०० रुपयांमधून लाभार्थी महिला सरासरी केवळ ४४.०६ रुपये नवीन कामधंदा किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी खर्च करत आहेत. महिला दरमहा मिळणारे पैसे नेमके कशावर खर्च करतात, याचा सरासरी हिशोब खालीलप्रमाणे आहे:
- घरातील रोजचा खर्च: सरासरी ५१८.६८ रुपये
- बचत (Savings): सरासरी ३७२.६८ रुपये
- मुलांचे शिक्षण: सरासरी १७८.५९ रुपये
- आरोग्य व दवाखाना: सरासरी १७६.८३ रुपये
- उत्पन्न मिळवून देणारे व्यवसाय/काम: केवळ ४४.०६ रुपये
- कर्जाचे हप्ते (EMI) फेडण्यासाठी: १८.५० रुपये
- सोने किंवा दागिने खरेदी: १५.९९ रुपये
बँक खाती उघडली, पण एटीएम आणि डिजिटल पेमेंटचा वापर कमीच
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बँक खाती उघडली गेली आणि बँकेशी त्यांचा संपर्क वाढला; परंतु स्वतः जाऊन एटीएम (ATM) कार्ड वापरणे, मोबाईलवरून डिजिटल पेमेंट करणे किंवा पैसे पाठवणे या गोष्टी स्वतः करणाऱ्या महिलांचे प्रमाण अजूनही कमी आहे. थेट खात्यात पैसे जमा होणे आणि त्या पैशांचा व्यवहार स्वतः हाताळणे, यामध्ये अद्याप मोठा फरक असल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या अहवालाला अंतिम मंजुरी दिली आहे. मोफत योजना आणि त्यातून सरकारी तिजोरीवर पडणारा ताण यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या योजनांचा महिलांच्या आयुष्यात नेमका काय बदल होतो, हे तपासण्यासाठी हा अभ्यास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. घरातील आर्थिक निर्णयांमध्ये महिलांचा शब्द आता अधिक विचारात घेतला जात असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पश्चिम महाराष्ट्रातील महिला आघाडीवर, तर विदर्भ व मराठवाड्यात अद्याप अडचणी
मुक्त विद्यापीठाने राज्यातील ६ जिल्ह्यांतील शहरी आणि ग्रामीण भागातील ४०८ लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष पाहणी केली. यातून राज्याच्या वेगवेगळ्या भागांत मोठा फरक असल्याचे समोर आले आहे:
- बँक व्यवहारांतील सहभाग: सर्वेक्षणातील ५५.४ टक्के महिला बँक आणि पैशांच्या व्यवहारांत चांगल्या प्रकारे सक्रिय आहेत, ३९.७ टक्के महिलांचा सहभाग मध्यम आहे, तर ४.९ टक्के महिला अजूनही बँकिंग व्यवहारांपासून लांब आहेत.
- बचत जास्त, पण बँकेत जाऊन व्यवहार कमी: तब्बल ७१.८ टक्के महिलांनी पैसे वाचवण्याची चांगली सवय लागल्याचे सांगितले, तर ६५.७ टक्के महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहिल्यासारखे वाटत आहे. मात्र, स्वतःहून एटीएम किंवा बँकेच्या सेवा वापरणाऱ्या महिलांचे प्रमाण केवळ ३३.६ टक्के इतकेच आहे.
- कोणता विभाग पुढे, कोणता मागे?: पैसे साठवणे आणि बँकेचे व्यवहार स्वतः हाताळण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील महिला (६९.९ टक्के) सर्वात पुढे आहेत. त्याखालोखाल मराठवाड्यात ५० टक्के, तर विदर्भात केवळ ४६.३ टक्के महिला या बाबतीत पुढे असल्याचे दिसून आले आहे.
📢 लाडकी बहीण योजनेसह महाराष्ट्रातील ईतर शासकीय योजना, नवीन शासन निर्णय (GR), आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



