सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण तरुणांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता अभियान’ सुरू केले आहे. या योजनेतून ५ दुधाळ गाई किंवा म्हशींचा गट खरेदी करण्यासाठी शासनाकडून ५ लाख ६७ हजार ५९० रुपयांपासून ते ८ लाख ५१ हजार ३८५ रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. येत्या २६ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार असून, त्याच दिवसापासून महाडीबीटी (MahaDBT 2.0) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
कोणत्या कामासाठी किती पैसे मिळणार?
या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानात केवळ गाई किंवा म्हशीच नाही, तर गोठा बांधकाम आणि आधुनिक यंत्रसामग्रीचाही खर्च धरण्यात आला आहे. शासनाने या संपूर्ण प्रकल्पाची किंमत ११ लाख ३५ हजार रुपये निश्चित केली आहे. यामध्ये प्रत्येकी १ लाख रुपयांप्रमाणे ५ दुधाळ गाई किंवा म्हशींसाठी ५ लाख रुपये, गोठा (शेड) बांधणीसाठी ३ लाख रुपये, कडबा कुट्टी यंत्र, सोलर आणि मिल्किंग मशीन या साधनसामग्रीसाठी २ लाख ७५ हजार रुपये, तर जनावरांच्या तीन वर्षांच्या विम्यासाठी ६० हजार रुपये खर्च गृहीत धरला आहे.
या एकूण ११ लाख ३५ हजार रुपयांच्या प्रकल्पावर सर्वसाधारण गटातील (Open आणि OBC) लाभार्थ्यांना ५० टक्के म्हणजेच ५ लाख ६७ हजार ५९० रुपये अनुदान मिळेल. तर अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST) प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के म्हणजेच ८ लाख ५१ हजार ३८५ रुपये अनुदान दिले जाईल. हे अनुदान दोन टप्प्यांत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केले जाईल; गोठा आणि यंत्रसामग्री उभारल्यानंतर पहिला ५० टक्के हप्ता, तर जनावरे खरेदी केल्यानंतर उर्वरित अनुदान खात्यात जमा होईल.
या योजनेसाठी कोण पात्र ठरणार?
राज्य शासनाच्या नियमांनुसार १ हेक्टर म्हणजेच अडीच एकरपर्यंत शेती असलेले अत्यल्प भूधारक शेतकरी, १ ते २ हेक्टर शेती असलेले अल्प भूधारक शेतकरी, वनहक्कधारक आणि या प्रवर्गातील महिला बचत गटांचे सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत महिलांसाठी ३० टक्के, तर दिव्यांग व्यक्तींसाठी ५ टक्के विशेष आरक्षण ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा: सोन्याचे दर घसरून ₹१.१४ लाखांवर; आता पुढे काय होणार? वाचा गोल्डमन सॅक्सचा नवा अंदाज.
अर्ज करण्यासाठी मुख्य अटी आणि कागदपत्रे
अर्जदाराकडे स्वतःची किमान १ एकर शेती असणे आवश्यक आहे; मात्र ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही, त्यांच्याकडे किमान ५ वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार (Lease Agreement) असला तरी ते अर्ज करण्यास पात्र राहतील. याशिवाय लाभार्थ्याकडे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे दुग्धव्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, किंवा संबंधित व्यक्तीने किमान २ वर्षे दूध संकलन संस्थेला दूध घातल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
येत्या २६ नोव्हेंबरपासून इच्छुक शेतकऱ्यांना mahadbt2.maharashtra.gov.in या महाडीबीटी २.० पोर्टलवर आपल्या ‘महा-आयडी’द्वारे लॉगिन करून ऑनलाईन अर्ज भरता येईल. अर्ज करताना आधार कार्ड, ७/१२ उतारा (किंवा ५ वर्षांचा भाडेपट्टा करार), दुग्धव्यवसाय प्रशिक्षण किंवा दूध संकलन संस्थेचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि लागू असल्यास जातीचा दाखला ही कागदपत्रे सोबत ठेवावीत.
(टीप: या अभियानाचा सविस्तर शासन निर्णय (GR) आणि बँक कर्जाच्या अटी तपासण्यासाठी २६ नोव्हेंबरनंतर महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी किंवा आपल्या पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.)
📢 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता अभियानासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कृषी योजना, शासन निर्णय (GR) आणि सांगली जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी Sangli Today ला गुगल वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



