सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यातील ज्या कुटुंबांचे घरकुल मंजूर होऊनही बांधकाम रखडले आहे किंवा तांत्रिक कारणांमुळे कामे प्रलंबित आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित घरकुलांची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाने कामांना गती द्यावी, असे सीईओ नरवाडे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. प्रत्येक तालुक्यात नेमकी किती घरकुले रखडली आहेत आणि ती पूर्ण होण्यात काय अडचणी आहेत, याचा आढावा घेत ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
सांगली जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलांची कामे सुरू आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नोंदीनुसार, यापूर्वी मंजूर झालेल्या घरकुलांपैकी जागेचे वाद, अतिक्रमण किंवा तांत्रिक अडचणींमुळे जी कामे अद्याप अपूर्ण आहेत, ती मार्गी लावण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच, ‘आवास प्लस सर्वेक्षण २०२४’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांतून ९५ हजार ६४८ बेघर व कच्च्या घरांत राहणाऱ्या कुटुंबांचे सर्वेक्षण होऊन ग्रामसभांमार्फत यादी अंतिम करण्यात आली आहे.
आता खुद्द मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्याने, ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर प्रलंबित असलेल्या घरकुल कामांना गती मिळणार आहे.
📢 सांगली जिल्ह्यातील घरकुल योजना, प्रशासकीय निर्णय आणि स्थानिक घडामोडी सर्वात आधी वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇



