सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): शहरातील कोल्हापूर रस्त्यावर चिंतामणी हॉलसमोर दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. हनुमाननगर परिसरातील रहिवासी सुरेश बसप्पा हदीमनी (वय ५०) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या दुर्घटनेत गुलाब कॉलनी येथील गुणधर शंकर आवळे (वय ७०) आणि कर्नाटक राज्यातील गोकाक तालुक्यातील बेनचंदमर्डी येथील रहिवासी रमेश उद्धप्पा खिलारे (वय ३५) हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सुरेश हदीमनी आणि गुणधर आवळे हे दोघेजण बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हनुमाननगर येथून अमरधाम स्मशानभूमीकडे रक्षाविसर्जनाच्या विधीसाठी दुचाकीवरून (क्रमांक एमएच १०, ईएफ ५८४०) निघाले होते. ते शंभरफुटी रस्त्यावरून कोल्हापूर रस्त्यावर येत होते.
त्याच वेळी रमेश खिलारे हे सांगली बसस्थानकाकडून अंकलीच्या दिशेने आपल्या मित्रासोबत दुसऱ्या दुचाकीवरून (क्रमांक केए २८, एचयु ९९१) गोकाककडे जात होते. दोन्ही रस्त्यांच्या कोपऱ्यावर भरधाव वेगात असलेल्या खिलारे यांच्या दुचाकीने हदीमनी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलीस व १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, अर्धा तास उलटूनही शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू शकली नाही. अखेर उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत जखमींना खासगी वाहनातून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रुग्णालयात उपचार सुरू असताना सुरेश हदीमनी यांची प्राणज्योत मालवली, तर जखमी गुणधर आवळे व रमेश खिलारे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
📢 सांगली जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, प्रशासन आणि महत्त्वाचे शासन निर्णय (GR) सर्वात आधी वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇



