सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली. मात्र, या निवडीच्या प्रक्रियेदरम्यान एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष महेंद्र लाड यांचे सुपुत्र, काँग्रेसचे माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांचे भाचे तसेच सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांचा वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांशी कथित अरेरावी व दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
जिल्हा बँकेच्या आवारात नेमके काय घडले?
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक महेंद्र लाड आणि उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) चे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी ही अधिकृत घोषणा केल्यानंतर बँक आवारात समर्थकांनी एकच जल्लोष केला. मात्र, याच घडामोडींचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार स्वप्नील यांच्याशी ऋषिकेश लाड यांचा वाद झाला.
समोर आलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये ऋषिकेश लाड हे पत्रकाराच्या दिशेने धावून जात “कोणता पत्रकार आहेस तू? कुठला पत्रकार आहेस तू? चला रे, चला…” अशा शब्दांत अरेरावीची भाषा वापरत दमदाटी करत असल्याचे दिसून येत आहे.
सांगलीचे राजकीय समीकरण
या निवडणुकीत महेंद्र लाड यांच्या अध्यक्षपदाच्या अर्जावर माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सूचक म्हणून, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. तसेच उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या अर्जावर आमदार अमोल बाबर सूचक आणि माजी खासदार संजय पाटील अनुमोदक होते. या बिनविरोध निवडीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे चर्चेत आली असतानाच, या व्हायरल व्हिडिओमुळे विजयाच्या आनंदावर विरजण पडल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकार अतुल यांचे ट्रोलर्सना प्रत्युत्तर
हा संपूर्ण प्रकार पत्रकार अतुल यांनी त्यांच्या ‘अनफिल्टर्ड अतुल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून समोर आणला, ज्याला अवघ्या काही तासांत नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर काही समर्थकांनी सोशल मीडियावर संबंधित पत्रकारांवर राजकीय पक्षपाताचे आरोप करत टीका सुरू केली. या टीकेला अतुल यांनी व्हिडिओद्वारे सडेतोड प्रत्युत्तर दिले:
“गेल्या पाच-सहा वर्षांपासून दिल्लीतील मुख्य प्रवाहातील पत्रकारितेपासून ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांपर्यंत काम करताना मी कोणत्याही राजकारण्याचा साधा चहादेखील घेतलेला नाही. मला शिकवलेली पत्रकारिता कोणत्याही एका पक्षाचे समर्थन करायला सांगत नाही. मग तो नेता काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो किंवा भाजपचा—जर कोणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या अंगावर धावून जात असेल, तर सत्तेला प्रश्न विचारणे हे आमचे कर्तव्यच आहे.”
सध्या राज्यातील प्रमुख वृत्तवाहिन्यांनीही या घटनेची दखल घेतली असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाशी संवाद साधताना लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संयम पाळावा, अशी अपेक्षा पत्रकार वर्तुळातून व्यक्त होत आहे.
📢 सांगली जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



