सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्ह्यातील नांद्रे आणि कर्नाळ या दोन्ही गावांच्या तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नांद्रे येथील श्री मारुती देव मंदिर व उमा महेश मंदिर आणि कर्नाळ येथील श्री दत्त मंदिर या तीन प्रमुख धार्मिक स्थळांचा शासनाच्या ‘क वर्ग तीर्थक्षेत्र’ यादीत अधिकृत समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे नांद्रे आणि कर्नाळ परिसरातील धार्मिक व सांस्कृतिक स्थळांच्या विकासाला शासकीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. राज्य शासनाच्या ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘क वर्ग’ दर्जा प्राप्त झाल्याने आता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या मंदिर परिसरातील मूलभूत सोयीसुविधा, अंतर्गत रस्ते, भक्तनिवास, स्वच्छतागृहे आणि सुशोभीकरणाच्या कामांसाठी शासन निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, या निर्णयाबाबत सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी माहिती देत राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत. ‘क वर्ग तीर्थक्षेत्र’ दर्जा मिळाल्यामुळे आगामी काळात दोन्ही गावांतील विविध विकासकामांना गती मिळणार असल्याने ग्रामस्थ व भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.



