मुंबई / सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर लाडकी बहीण योजनेची बंद झालेली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचे संदेश मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत.
या संदेशांवर विश्वास ठेवून ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक महिला घरची कामे सोडून महा-ई-सेवा केंद्रे, सेतू कार्यालये आणि सीएससी (CSC) केंद्रांवर गर्दी करत आहेत.
मात्र, या संपूर्ण प्रकाराबाबत महिला व बालविकास विभागाच्या स्थानिक प्रशासनाकडून महत्त्वाची वस्तुस्थिती समोर आली आहे. योजनेचा बंद झालेला लाभ पूर्ववत करण्यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ आणि त्यानंतर केवळ राहिलेल्या महिलांसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ई-केवायसीची मुदत देण्यात आली होती.
त्यानंतर तांत्रिक कारणास्तव ही प्रक्रिया बंद असून, अद्याप शासनाकडून ई-केवायसी पुन्हा सुरू करण्याबाबत कोणताही अधिकृत शासन निर्णय किंवा पत्रव्यवहार प्राप्त झालेला नाही, असे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी अधिकृत पोर्टलवर ई-केवायसीची सुविधा सुरू नसतानाही काही केंद्रांवर गर्दी होत असल्याने महिलांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. तसेच काही तांत्रिक कारणांमुळे आणि ओटीपीच्या अडचणींमुळे महिलांचा नाहक वेळ व पैसा खर्च होत असल्याने प्रशासनाने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण द्यावे आणि वंचित महिलांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून होत आहे.
दरम्यान, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. सद्यस्थितीत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नसल्याने लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष शासनाच्या पुढील अधिकृत घोषणेकडे लागले आहे.
महिला व बालविकास विभागाकडून अधिकृत सूचना किंवा शासन निर्णय (GR) जाहीर होईपर्यंत लाभार्थी महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यकपणे केंद्रांवर गर्दी करू नये. योजनेच्या अधिकृत माहितीसाठी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा स्थानिक अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प कार्यालयाचाच आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
📢 लाडकी बहीण योजनेसह महाराष्ट्रातील ईतर शासकीय योजना, नवीन शासन निर्णय (GR), आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



