मुंबई / सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): मुंबई ते पुणे आणि पुढे सांगली व बंगळुरूकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रस्ते पायाभूत सुविधांबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्याच्या मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन ग्रीनफील्ड मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि व्यवहार्यता अभ्यास तयार करण्याच्या निविदा उघडण्याची तारीख राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलली आहे.
या प्रकल्पासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती झाल्यानंतर संबंधित संस्थेला ३६५ दिवसांच्या आत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करणे बंधनकारक असणार आहे. हा अहवाल तयार होऊन त्याला केंद्र व राज्य शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यामुळे या नवीन महामार्गाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यास अद्याप तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवीन प्रस्तावित द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी सुमारे १३० किलोमीटर इतकी असणार आहे. पागोटे ते चौक या महामार्गाचा शेवट जिथे होतो, तिथून या नव्या महामार्गाची सुरुवात होईल आणि पुण्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या शिवरे गावाजवळ तो पुणे बाह्य वळण मार्गाला जोडला जाईल. विशेष म्हणजे आगामी पुणे-बंगळुरू ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग शिवरे लगतच्या खोपी येथून सुरू होत असल्याने या दोन्ही महामार्गांची थेट जोडणी होणार आहे.
या ऐतिहासिक जोडणीमुळे भविष्यात मुंबईपासून थेट पुणे, सांगली, कोल्हापूर मार्गे बंगळुरू पर्यंत वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करणे शक्य होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक, कृषी आणि व्यापारी वाहतुकीला मोठी चालना मिळणार असून प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
हेही वाचा: बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी; नोंदणी, नूतनीकरण आणि योजनांच्या दाव्यांसाठी आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ.



