सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचे आणि सहकार क्षेत्राचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (SDCC) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज (बुधवार, दि. १८) बिनविरोध पार पडली. बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) संचालक तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नूतन संचालक मंडळाची ही पहिलीच बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवड प्रक्रियेला बँकेच्या २१ पैकी २० संचालकांनी हजेरी लावली होती, तर आमदार गोपीचंद पडळकर हे एकमेव संचालक गैरहजर राहिल्याचे पाहायला मिळाले.
पक्षीय बलाबल आणि राजकीय समीकरणे
जिल्हा बँकेच्या २१ संचालकांपैकी १५ जण यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित ६ जागांसाठी मतदान झाले होते. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार काँग्रेसचे ६, भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३ आणि शिवसेना (शिंदे गट) ३ असे संचालक आहेत.
आकड्यांच्या गणितात महायुतीचे ११ आणि महाविकास आघाडीचे १० संचालक दिसत असले तरी प्रत्यक्ष सत्ता स्थापनेची समीकरणे वेगळी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संचालक रणधीर नाईक यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याची भूमिका जाहीर केली, तर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी स्वतंत्र भूमिका घेतली. तसेच जिल्हा परिषदेच्या धर्तीवर शिवसेना शिंदे गटाचे तानाजी पाटील यांनीही महाविकास आघाडीला साथ दिल्याने महाविकास आघाडीचे पारडे जड ठरले.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या बैठकीत सर्वाधिक जागा असलेल्या काँग्रेसकडे अध्यक्षपद देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. त्यानुसार अध्यक्षपदासाठी महेंद्र लाड आणि उपाध्यक्षपदासाठी तानाजी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन ही निवड बिनविरोध पूर्ण झाली.



