सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचा डंका आता थेट राष्ट्रीय स्तरावर वाजू लागला आहे. हरियाणा सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील ग्रामपंचायत व नगरपालिका सक्षमीकरण परिषदेसाठी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शिवदास चंद्रकांत भोसले यांची निवड झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून केवळ दोन सरपंचांची या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली असून, या यशाबद्दल सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सरपंच भोसले व ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन केले.
‘अभ्यासाचा भोंगा’ आणि ४३ हजारांहून अधिक वृक्षारोपणाची देशपातळीवर दखल
सरपंच शिवदास भोसले यांच्या नेतृत्वाखाली अग्रण धुळगाव ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. यामध्ये दररोज संध्याकाळी ७ ते ९ आणि पहाटे ५ ते ७ या वेळेत वाजणारा ‘अभ्यासाचा भोंगा’ राज्य स्तरावर विशेष प्रसिद्ध झाला आहे. भोंगा वाजताच संपूर्ण गावातील टीव्ही आणि मोबाईल बंद होऊन मुले अभ्यासाला बसतात.
याशिवाय गावात सेंद्रिय शेतीचे दालन, महिला सक्षमीकरण, जलक्रांती आणि पर्यावरण संवर्धनासाठी तब्बल ४३ हजार ७२० वृक्षांची लागवड करून त्यांचे यशस्वी संगोपन करण्यात आले आहे. गावातील मुलांचे शिक्षण, महिलांचा सहभाग आणि लोकसहभागातून साधलेला हा सर्वांगीण विकास आता देशभरातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
📢 सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे नावीन्यपूर्ण उपक्रम, जिल्हा परिषदेचे निर्णय आणि स्थानिक यशोगाथा सर्वात आधी वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇



