सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (OTS) प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेची सांगली जिल्ह्यातील ७ हजार ९४६ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची २ लाखांवरील रक्कम बँकेत भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत राहणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
कुठे पाहता येणार यादी?
शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात, पात्र शेतकऱ्यांनी २ लाखांवरील त्यांच्या हिश्श्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर शासनाकडून २ लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील पात्र ७,९४६ शेतकऱ्यांमध्ये जिल्हा बँकेचे ६,२६२ तर राष्ट्रीयकृत बँकांचे १,६८४ शेतकरी आहेत. ही लाभार्थी यादी शेतकऱ्यांना आपल्या गावातील ग्रामपंचायत, विकास संस्था आणि संबंधित बँकेच्या शाखेत पाहायला मिळणार आहे.
पैसे भरताना ‘ही’ महत्त्वाची काळजी घ्या
प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्जखाते तपशील, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनाकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम स्पष्टपणे दिलेली आहे. शेतकऱ्यांनी हा तपशील तपासून आपल्या हिश्श्याची २ लाखांवरील रक्कम बँकेत भरायची आहे.
ज्या शेतकऱ्यांचे कर्जखाते एकाच बँकेत आहे, त्यांनी त्याच खात्यात पैसे भरावेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांची एकापेक्षा जास्त कर्जखाती आहेत, त्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम कोणत्याही एका कर्जखात्यात भरण्याची सोय देण्यात आली आहे. फक्त ओटीएस योजनेनुसार बँकेला देय असलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे खात्यात भरू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पैसे भरल्यानंतर पुढे काय करायचे?
शेतकऱ्याने २ लाखांवरील रक्कम बँकेत भरल्यानंतर संबंधित बँक दर शुक्रवारी ही माहिती पोर्टलवर अपलोड करेल आणि शेतकऱ्याला कळवेल. माहिती अद्ययावत झाल्यानंतर तीन दिवसांनी शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची (Aadhaar Authentication) सुविधा सुरू होईल. योजनेच्या नियमानुसार ओटीपीद्वारे नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरच या कर्जमाफीचा लाभ जमा होणार आहे. यापुढील टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्याही प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
📢 कर्जमाफीच्या नवीन याद्या, कृषी योजना आणि सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी सांगली टुडे ला गुगल वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇



