सांगली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली आगारअंतर्गत विश्रामबाग कक्षाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी थांबा तसेच वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या कक्षातून आता विश्रामबाग-चिंचवडसाठी दोन नवीन बसेस सुरू करण्यात आल्या असून, 50 लांब पल्ल्याच्या बसेसना थांबा देण्यात आला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पास मिळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
पूर्वी या बस थांब्यावर फिरते विक्रेते व बेघर व्यक्तींचा वावर वाढल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. सांगली आगाराने या ठिकाणी स्वच्छता करून थांबा सुस्थितीत आणला आहे. आता येथे कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात आल्याने प्रवाशांची अधिक सोय होणार आहे.
सध्या या कक्षातून दररोज 50 हून अधिक बसेस सुटणार असून, यात लांब पल्ल्याच्या बसेसचाही समावेश आहे. विश्रामबाग-चिंचवड या मार्गावर दुपारी 2.30 वाजता आणि रात्री 11 वाजता बसेस सुटणार असल्याचे सांगण्यात आले.
विश्रामबाग थांब्यावर रिक्षांचा विळखा असल्याने बस वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार असून, याबाबत वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही प्रवाशांकडून होत आहे.
हेही वाचा: आयकर अधिकारी असल्याचा बनाव करून एक कोटींचा गंडा घालणाऱ्या मास्टरमाईंडला अटक.