सांगली : मयूर नर्सरी आगीतील मृत्यू प्रकरणात संशय वाढला; पती अजूनही पसार, पाच पथकांकडून शोधमोहीम सुरु

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
प्रतीकात्मक फोटो – Sangli Today

सांगली : शहरातील धामणी रस्त्यावरील शांतीबन चौकात असलेल्या मयूर नर्सरीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या निकिता शिव मनगुळे-लोंढे (वय २५) यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच गडद होत आहे. या प्रकरणात मृत महिलेचा पती शिव मनगुळे-लोंढे अद्याप पसार असून, त्याचा शोध घेण्यासाठी विश्रामबाग पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची एकूण पाच पथके रवाना करण्यात आली आहेत.

शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सांगली–धामणी रस्त्यावरील मयूर नर्सरीमधील पत्र्याच्या शेडला अचानक भीषण आग लागली होती. या आगीत नर्सरीमध्ये वास्तव्यास असलेल्या निकिता मनगुळे-लोंढे यांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली होती.

घटनेनंतर मृत महिलेचा पती शिव मनगुळे-लोंढे हा घटनास्थळावर आढळून न आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. त्याचा मोबाईल फोन बंद असल्यामुळे पोलिसांच्या शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. पोलिसांकडून त्याच्या संभाव्य ठिकाणांचा शोध घेतला जात असून नातेवाईक, ओळखीचे लोक आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून माहिती संकलित केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता खुनाच्या संशयाच्या दृष्टीने सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक चौकशीत आगीपूर्वी पती-पत्नीमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली असून, दोघांमध्ये कौटुंबिक कारणांवरून यापूर्वीही वाद होत असल्याची चर्चा आहे. मात्र, या बाबींची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

शवविच्छेदन अहवाल व तांत्रिक तपासाच्या आधारे पुढील निष्कर्ष काढले जाणार आहेत. निकिताचा मृत्यू नेमका अपघाती आग, शॉर्टसर्किट किंवा अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याचा सखोल तपास सुरू असल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले.

पती शिव मनगुळे-लोंढे याला ताब्यात घेतल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले असून, तपासाची दिशा सध्या सर्व शक्यतांचा विचार करून पुढे नेण्यात येत आहे.

हेही वाचा: राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ‘Best ERO’ पुरस्कार; 2024 मधील कामगिरीसाठी IAS विशाल नरवाडे यांचा सन्मान.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा