शिराळा (सांगली) – चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीवर डिझेल ओतून पेटवल्याची धक्कादायक घटना सावंतवाडी गावात घडली. गंभीर भाजल्याने पत्नीचा सांगली शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कोकरूड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिता संजय बेंगडे (वय 40) आणि त्यांचे पती संजय बयाजी बेंगडे (वय 53) सावंतवाडी येथे राहत होते. मुलगा मुंबईत कामानिमित्त असल्याने घरी दोघेच असत. संजय याला दारूचे व्यसन असल्याने तो वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि मारहाण करत असे.
गुरुवारी रात्री अनिता स्वयंपाक करत असताना संजयने वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर चूल पेटवण्यासाठी आणलेले डिझेल पत्नीच्या अंगावर ओतून काडीपेटीने आग लावली. जिवाच्या आकांताने ओरडत अनिता घराबाहेर पळाल्या. शेजाऱ्यांनी तत्काळ पाणी टाकून आग आटोक्यात आणली आणि गंभीर भाजलेल्या अनिताला सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले.
अनितावर तीन दिवस उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृत्यूपूर्वी त्यांचा जबाब नोंदवला होता, ज्यावरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी पोलिसांनी संजय बेंगडे याला अटक केली असून सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील व सहायक निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
🔴 हेही वाचा 👉 दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने महिलेची १० लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.