Sangli Crime News | सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोराला अटक करून १६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि कर्नाटकातील २० हून अधिक वाहनचोरीच्या प्रकरणांचा तपास उलगडला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फिरोज नबीलाल मुल्ला (वय ३१, रा. जुळेवाडी, ता. तासगाव) असे असून, तो गेल्या काही महिन्यांपासून विविध ठिकाणांहून दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरत होता. चोरीसाठी तो डुप्लीकेट चाव्यांचा वापर करायचा, तसेच स्थानिक स्तरावर ही वाहने कमी दरात वापरण्यास देत असल्याचे उघड झाले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतिश शिंदे आणि सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. जुळेवाडी परिसरातून २१ दुचाकी आणि एक चारचाकी जप्त करून मुद्देमाल कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सध्या आरोपीकडून अधिक चौकशी सुरू असून, वाहनचोरीशी संबंधित इतर प्रकरणे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: सांगलीचे सीईओ श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे यांना ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार.