सांगली : कृष्णामाई नदी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सांगली शहरात भाविकांची मोठी गर्दी जमली असतानाच रविवारी सायंकाळी एक गंभीर घटना घडली. गणपती पेठ ते टिळक चौक दरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कार चालकाने बेदरकारपणे वाहन चालवत गर्दीत घुसून नागरिक आणि पोलिसांना धडक दिली. या घटनेत १४ ते १५ जण जखमी झाले असून त्यामध्ये सहा पोलिसांचा समावेश आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास कृष्णा घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. वाहतूक संथ झाली होती आणि ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशाच वेळी गणपती पेठेकडून टिळक चौकाच्या दिशेने येणाऱ्या एका कारने अचानक वेग वाढवला आणि वाटेत येणाऱ्या दुचाकी, पादचारी तसेच बंदोबस्तावरील पोलिसांना धडक देत गाडी सुसाट पळवण्यास सुरुवात केली.
काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या कडेला धावत होते. काही दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाल्या. लहान मुले, महिला तसेच रस्त्यावर उपस्थित नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
गर्दीतून गाड्या उडवत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाचा नागरिकांनी पाठलाग केला. अखेर त्याला अडवून कारमधून बाहेर ओढण्यात आले आणि संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत चालकाला ताब्यात घेतले.
जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सध्या कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर टिळक चौक परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या घटनेची दखल घेत पोलिस प्रशासनाला आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जखमी नागरिकांना तातडीने योग्य उपचार देण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: दुर्धर आजारांसाठी सांगली जिल्हा परिषदेची ‘राजारामबापू पाटील आर्थिक मदत योजना’; ग्रामीण रुग्णांना आर्थिक मदत.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










