विटा : घरगुती त्रासाला कंटाळून विटा येथील नववीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मित्रांनी सोमवारी सकाळी घर सोडून थेट कराड गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामाच्या शोधात फिरत असताना कराड शहर पोलिसांनी दोघांनाही सुरक्षित ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, विट्यातील दोघे जिवलग मित्र दररोज एकत्र शाळेत जात येत असत. त्यापैकी एकाला घरात काकाकडून वारंवार मारहाण होत होती. हा प्रकार त्याने आपल्या मित्राला सांगितला. मित्राचा त्रास ऐकून व्याकुळ झालेल्या दुसऱ्या मुलानेही त्याच्यासोबत घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला.
दोघांनीही घरातील कपडे बॅगेत भरले व थेट कराड गाठले. कराड मधील बिरोबा मंदिर परिसरातील एका कपड्याच्या दुकानात बसलेल्या कार्वे येथील सुरेश थोरात यांच्याकडे त्यांनी येथे काही काम मिळेल काय अशी विचारणा केली. संशय आल्याने तसेच मुलांची काळजी वाटल्याने थोरात यांनी दोघांशी आपुलकीने संवाद साधून तत्काळ कराड शहर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
दोघांना कराड पोलिस ठाण्यात आणण्यात आले, चौकशीदरम्यान एकाने घरात काकाकडून होणाऱ्या मारहाणीबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघांची समजूत काढत त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला व संबंधित पालकांना कराड येथे बोलावण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, अल्पवयीन मुलांनी घर सोडून पळून जाण्याची ही घटना कुटुंबीय, शिक्षक आणि समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. घरातील तणाव आणि संवादाचा अभाव मुलांना टोकाचा निर्णय घ्यायला भाग पाडत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.
हेही वाचा: पेन्शन काढायला गेलेल्या दिव्यांग पादचाऱ्याचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू; ईश्वरपूर बसस्थानकाजवळ दुर्घटना.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










