जत: तालुक्यातील संख परिसरात रविवारी मध्यरात्री महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उमदी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत दोन संशयितांना ताब्यात घेतले.
संतोष शिवाप्पा बिरादार (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते महावितरणमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते. संखजवळील पांडोझरी परिसरात त्यांनी घर बांधले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री संतोष बिरादार हे कुटुंबासह घराच्या व्हरांड्यात झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या छातीत जवळून गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संख-दरीबडची मार्गावर संशयित फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी रोहित ऊर्फ नागेश जगदाळे याला ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणात महांतेश स्वामी याचाही सहभाग समोर आला.
त्यानंतर पोलिसांनी जाडरबोबलाद-माडग्याळ रस्त्यालगतच्या शेत परिसरात छापा टाकून दुसऱ्या संशयितालाही ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत पैशाच्या व्यवहारातून वाद आणि पूर्वीचे भांडण हे खुनामागील कारण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घरासमोर शेड उभारण्याच्या कारणावरूनही वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




