सांगली : युवा पिढीने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी केले आहे. 31 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले.
यंदाच्या वर्षासाठी “Unmasking the appeal – Countering nicotine and tobacco addiction” ही थीम जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात 2017-18 पासून विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
जिल्ह्यात सध्या 9 आरोग्य संस्थांमध्ये तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले जाते. 2025-26 या वर्षात एकूण 2361 व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शाळा स्तरावर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि सलाम मुंबई फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नातून शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आरोग्य विभाग, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणे, पान शॉप आणि शालेय परिसरात कारवाई सुरू असून 2025-26 मध्ये कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ₹9,400 दंड वसूल करण्यात आला आहे.




