Sangli Jobs: आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ड्रोन क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी) संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना आधुनिक कौशल्ये उपलब्ध करून देत रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेती, हवाई सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, उद्योग, चित्रीकरण, सुरक्षा आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत असल्याने प्रशिक्षित ड्रोन पायलटची मागणीही वाढत आहे.
या प्रशिक्षणामध्ये ड्रोन हाताळणी, सुरक्षा नियम, डिजिटल मॅपिंग, कृषी क्षेत्रातील ड्रोनचा वापर, हवाई सर्वेक्षण तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा समावेश असेल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवकांना भविष्यात विविध क्षेत्रांमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
विशेषतः ग्रामीण भागातील युवक-युवतींना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे. त्यामुळे आधुनिक कौशल्ये आत्मसात करून करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अमृत संस्थेच्या https://mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा संस्थेशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी:
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत)
राजवाडा, सांगली
मोबाईल : 9112228766




