सांगली : वानलेसवाडी परिसरात दूध घेऊन मुलासोबत घरी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील गंठणाला अनोळखी व्यक्तीने हिसका मारून पसार झाल्याची घटना घडली. या प्रकारात गंठणाचा काही भाग चोरट्याच्या हाताला लागला, तर उर्वरित भाग महिलेच्या हातात राहिला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 7.10 वाजता रुक्मिणी गार्डन, वानलेसवाडी येथील किराणा दुकानासमोरील रस्त्यावर घडली. महिला तिच्या मुलासोबत परिसरातील किराणा दुकानातून दूध घेऊन पायी घरी जात होती.
यावेळी महिलेच्या मागून एक अनोळखी व्यक्ती वेगाने पुढे जात होता. त्याला बाजू देण्यासाठी महिला बाजूला सरकत असतानाच त्याने महिलेच्या गळ्यातील गंठणाला जोरात हिसका मारला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलेचा तोल गेला. तिने गंठण हाताने पकडल्याने गंठणाचा काही भाग महिलेच्या हातात राहिला,
घटनेनंतर महिलेच्या मुलाने आरडाओरड करत चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत चोरटा रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपातून सांगली-मिरज रोडच्या दिशेने पसार झाला. या घटनेत महिलेच्या गळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.




