सांगली : गाडीचा वेग जास्त होता, हेल्मेट घातले नव्हते किंवा सिग्नल तोडला, असा वाहतूक दंडाचा मेसेज मोबाईलवर आला आणि त्यात दंडाची रक्कम भरण्यासाठी लिंक दिली असेल, तर सावधान! सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी बनावट ई-चलन (Fake e-Challan) पाठवून बँक खात्यातील रक्कम लंपास करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर विभागाने नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, सांगली पोलिसांनीही स्थानिक वाहनचालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगून पाठवल्या जाणाऱ्या या संदेशांमध्ये बनावट लिंक किंवा क्युआर कोड (QR Code) असतो. त्यावर क्लिक करताच नागरिकांचे आर्थिक नुकसान तसेच वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
फसवणूक नेमकी कशी केली जाते?
महाराष्ट्र सायबरने स्पष्ट केल्यानुसार, सायबर गुन्हेगार खालील प्रमाणे वाहनचालकांची फसवणूक करतात:
- बनावट मेसेज पाठवणे: वाहनचालकांना SMS किंवा WhatsApp द्वारे वाहतूक नियमांचा भंग केल्याचे सांगून खोटे ई-चलन पाठवले जाते.
- हुबेहूब सरकारी स्वरूप: हा संदेश अधिकृत सरकारी यंत्रणेसारखा वाटावा यासाठी त्यावर शासकीय चिन्हे किंवा मजकूर वापरला जातो.
- बनावट लिंक किंवा QR कोड: दंडाचे पैसे भरण्यासाठी मेसेजमध्ये दिलेली लिंक उघडण्यास किंवा क्युआर कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते.
- बनावट ॲप (APK File): पेमेंटच्या नावाखाली मोबाईलमध्ये धोकादायक ॲप (APK फाइल) डाऊनलोड करण्यास सांगितले जाते.
- डेटा आणि पैसे चोरी: या प्रक्रियेतून बँक खात्याची गोपनीय माहिती, पासवर्ड आणि पैसे गुन्हेगारांकडून लंपास केले जातात.
बनावट मेसेज कसा ओळखाल? (धोक्याचे ५ संकेत)
- त्वरित पेमेंटचा दबाव: तातडीने पैसे भरण्यासाठी मेसेजमध्ये अनाठायी घाई किंवा कारवाईची भीती दाखवली जाते.
- संशयास्पद लिंक व QR कोड: अधिकृत सरकारी संकेतस्थळाऐवजी त्रयस्थ (Third-party) किंवा संशयास्पद लिंक दिल्या जातात.
- APK फाईल इन्स्टॉल: शासकीय यंत्रणा कधीही चलन भरण्यासाठी वेगळे APK ॲप डाऊनलोड करायला लावत नाही.
- अनोळखी क्रमांक: शासकीय चलन अधिकृत सेवेद्वारे येते; ते कोणत्याही अनोळखी वैयक्तिक मोबाईल नंबरवरून किंवा ईमेलवरून येत नाही.
- स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका: बनावट संदेशांमध्ये स्पेलिंग अथवा व्याकरणात चुका आढळतात.
फसवणूक टाळण्यासाठी काय खबरदारी घ्याल?
- वाहतूक दंडाची पडताळणी केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (echallan.parivahan.gov.in) किंवा अधिकृत ॲपमधूनच करा.
- अनोळखी नंबरवरून आलेल्या संदेशांमधील लिंकवर क्लिक करू नका किंवा अनोळखी ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करू नका.
- स्वतःचा OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक खात्याचा तपशील कोणत्याही अनोळखी पोर्टलवर प्रविष्ट करू नका.
फसवणूक झाल्यास तातडीने काय पावले उचलावीत?
- १९३० वर संपर्क: फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर कॉल करा किंवा mhcyber.gov.in वर तक्रार नोंदवा.
- बँक खाते ब्लॉक करा: तत्काळ संबंधित बँकेशी संपर्क साधून खात्यातील व्यवहार, इंटरनेट बँकिंग व कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करा.
- पुरावे जतन करा: फसव्या मेसेजचे स्क्रीनशॉट्स, लिंक आणि व्यवहाराचे तपशील सुरक्षित ठेवून नजीकच्या पोलीस ठाण्यात अथवा सायबर सेलकडे लेखी तक्रार द्या.
हेही वाचा: मुंबई-बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर’ सांगली की सोलापूर मार्गे? सांगली-बेळगाव मार्गासाठी प्रवाशांची जोरदार मागणी.




