सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): कोयना जलाशयातून वीजनिर्मिती केल्यानंतर समुद्राला वाहून जाणारे ६७.५ टीएमसी पाणी मुंबई शहरासाठी नेण्याचा प्रकल्प राज्य सरकार हाती घेण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर खानापूर–आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी आज विटा येथे पत्रकार परिषद घेत सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी आग्रही भूमिका मांडली. “मुंबईला पाणी नेण्याबद्दल आमची अजिबात हरकत नाही; मात्र त्यापूर्वी दुष्काळाने होरपळणाऱ्या सांगली-साताऱ्याची तहान भागवा आणि दुष्काळी परिस्थितीत सांगली जिल्ह्यासाठी कोयना धरण क्षेत्रातून किमान २५ टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याची कायमस्वरूपी तरतूद करावी,” अशी मागणी आमदार बाबर यांनी केली आहे.
विटा येथे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार बाबर म्हणाले की, वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाया जाणारे पाणी वापरात यावे, ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती आणि राज्य शासनाचा हा निर्णय नक्कीच अभिनंदनीय आहे. मुंबई ही आपल्या राज्याची व देशाची आर्थिक राजधानी असल्याने तिला पाणी मिळालेच पाहिजे. मात्र, कोयना धरणात १०५ टीएमसी पाणी उपलब्ध असताना ११७ टीएमसी पाण्याचे नियोजन केले गेले आहे. त्यापैकी सिंचनासाठी ४२.५ टीएमसी, तर जलविद्युत निर्मितीसाठी ६७.५ टीएमसी पाण्याची तरतूद आहे. विजेची गरज भासल्यास वीज विकत घेता येऊ शकते, पण पाण्याला पर्याय नसल्याने दुष्काळी भागातील शेती आणि जनजीवन वाचवण्यासाठी पाण्यालाच प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी फेरनियोजनाची अंमलबजावणी करा
सांगली जिल्ह्याचे एकूण कृषी क्षेत्र सुमारे ४.५ लाख हेक्टर असून त्यामध्ये ५० हजार हेक्टर फळबागा आणि दीड लाख हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान केवळ ६७० मिमी असून खानापूर, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यांमध्ये त्याहूनही कमी पाऊस पडतो. त्यामुळे ऑक्टोबर २०२३ मध्ये मंजूर झालेल्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या तीन सिंचन योजनांच्या १४ टीएमसी पाणीवाढीच्या फेरनियोजनाची (एकूण ७६.९९ टीएमसी पाणी) तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या सर्व मागण्यांसाठी लवकरच मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.
📢 सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना, राजकीय घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी सांगली टुडे ला गुगल वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇



