देवराष्ट्रे (ता. कडेगाव) : देवराष्ट्रे परिसरात शनिवारी दुपारी ऊस तोडणी सुरू असताना एका युवकावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली. मात्र युवकाची प्रसंगावधानता आणि पाळीव कुत्र्यांच्या प्रतिकारामुळे मोठा अनर्थ टळला.
भरत साळुंखे हे शेतात ऊस तोडत असताना जवळच्या झाडीत हालचाल जाणवल्याने त्यांनी पाहणी केली. यावेळी दोन पिल्लांसह दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झेप घेतली. साळुंखे यांनी प्रसंगावधान राखत हल्ला चुकवला.
याचवेळी साळुंखे यांच्यासोबत असलेल्या रॉटव्हिलर आणि बेल्जियम शेफर्ड जातीच्या दोन पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर प्रतिहल्ला केला. कुत्र्यांच्या आक्रमक प्रतिकारामुळे बिबट्या आणि त्याचे एक पिल्लू उसाच्या शेतातून पळून गेले.
दरम्यान, उर्वरित दोन पिल्ले शेतालगत असलेल्या ओढ्याच्या काठावरील झाडीत लपली. कुत्री त्या दिशेने गेल्याने भीतीपोटी ही पिल्ले झाडावर चढून बसली. घटनेनंतर परिसरात ग्रामस्थांची गर्दी झाली आणि तब्बल तीन तास बिबट्याची पिल्ले झाडावरच अडकून राहिली.
घटनेची माहिती मिळताच सागरेश्वर अभयारण्याचे वनक्षेत्रपाल बालाजी चव्हाण यांच्यासह वनपाल एस. एस. कुंभार, एस. टी. गवते, वनरक्षक रोहन मेक्षे, एम. एम. मुसळे व इतर कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या पथकाने योग्य खबरदारी घेत बिबट्याच्या तिन्ही पिल्लांची सुरक्षित सुटका केली.
या घटनेनंतर देवराष्ट्रे व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा: एरंडोलीत अज्ञात वाहनाची भीषण धडक; दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू.
- वाळवा तालुक्यात भीषण अपघात; पुलावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत









