मुंबई (सांगली टुडे वृत्तसेवा) : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त आयएएस तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत सोशल मीडिया आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू असलेल्या जोरदार चर्चांना खुद्द मुंढे यांनीच पूर्णविराम दिला आहे. “नाही, माझी एफडीएमधून बदली झालेली नाही. मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणूनच कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे,” अशा शब्दांत त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.
बदलीची चर्चा का रंगली होती?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता आणि सुधारणांसाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीच्या सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ही नवीन जबाबदारी मिळताच, अन्न भेसळ लॉबीच्या दबावातून मुंढे यांची एफडीए आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणावर पसरल्या होत्या.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा धडाका
ऐन दिवाळी सणाच्या काळात भेसळयुक्त खवा, निकृष्ट खाद्यतेल, बनावट मिठाई आणि गुटखा विक्रीविरोधात एफडीएने राज्यभरात मोठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मुंढे यांनी स्वतः या मोहिमेचे नेतृत्व करत अनेक ठिकाणी तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर राज्यातील नागरिक आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून, भेसळखोरांवर आणखी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा: शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ.




