सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): दिवाळीपूर्वी राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा सन्मान निधी जमा करून शासनाने दिलासा दिला होता. मात्र, सणासुदीच्या काळात सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित ३ हजार रुपये मिळतील अशी आशा महिला बाळगून होत्या. प्रत्यक्षात खात्यात केवळ एकाच महिन्याचा हप्ता जमा झाल्याने आता दिवाळी संपताच ऑक्टोबर महिन्याचे थकीत १५०० रुपये नेमके कधी खात्यात जमा होणार, असा थेट सवाल महिला वर्गातून विचारला जात आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून निधी वितरणाबाबत हालचाली वेगाने सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
सध्याच्या नियोजनानुसार आगामी १० नोव्हेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत ऑक्टोबर महिन्याच्या थकीत निधी वितरणाला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या ही मंजुरी मिळाल्यास १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान डीबीटी प्रणालीद्वारे निधी वर्ग करण्याचे काम सुरू होईल. तसेच प्रशासकीय व तांत्रिक अडचणी लक्षात घेता येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत बहुतांश पात्र महिलांच्या खात्यात हे पैसे जमा करण्याचे नियोजन वित्त विभागाने आखले आहे. मात्र काही कारणास्तव २२ नोव्हेंबरपर्यंत महिला व बालविकास विभागाचा अधिकृत शासन निर्णय रखडला, तर हा हप्ता थेट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबू शकतो.
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकतीच सरसकट ५ हजार रुपयांची मदत थेट बँक खात्यात पाठवण्यात आली आहे. शेतकरी अनुदानाचे हे मोठे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे प्रशासनाचे संपूर्ण लक्ष दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम मदत जमा करण्यावर आहे.
हेही वाचा: जमिनीची कागदपत्रे नसली तरी मिळणार शेतकरी ओळखपत्र; राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा नवीन नियम.
दरम्यान, हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी महिलांनी स्वतःच्या बँक खात्याची स्थिती तपासून घेणे गरजेचे ठरणार आहे. विशेषतः बँक खाते आधार क्रमांकाशी डीबीटीसाठी सक्रिय असणे अत्यंत आवश्यक असून, ई-केवायसी पडताळणी पूर्ण झालेली असावी. तसेच अनेक महिलांची खाती जनधन किंवा झिरो बॅलन्स स्वरूपाची असल्याने त्यावर मासिक व्यवहारांची मर्यादा असते; त्यामुळे बँकेत जाऊन अशी खाती वेळेत नियमित करून घेणे फायद्याचे ठरेल, जेणेकरून शासनाने पैसे जमा केल्यावर ते तांत्रिक कारणास्तव अडकणार नाहीत.
📢 लाडकी बहीण योजनेसह महाराष्ट्रातील ईतर शासकीय योजना, नवीन शासन निर्णय (GR), आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



