सांगली (सांगली टुडे विशेष वृत्त): दिवाळी सणाच्या तोंडावर दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबांना आधार मिळावा म्हणून राज्य शासनाने ५ हजार रुपयांची अग्रिम मदत थेट बँक खात्यात (DBT) वर्ग करण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र सण तोंडावर आलेला असतानाही लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम अद्याप जमा झालेली नाही. प्रशासनाकडून आणि मंत्र्यांकडून “९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग केला” असा दावा केला जात असला, तरी गावपातळीवरील चित्र मात्र वेगळेच आहे. आजही अनेक शेतकरी बँकेच्या फेऱ्या मारत असून खात्यावर पैसे न आल्याने त्यांच्यात नाराजी पाहायला मिळत आहे.
नेमकी ही ५ हजार रुपयांची मदत का अडकली आहे? कोणत्या तांत्रिक अडचणींमुळे पैसे खात्यावर दिसत नाहीत? याविषयी प्रत्यक्ष समोर आलेली कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१. आधार आणि बँक खाते ‘डीबीटी’साठी लिंक नसणे (Aadhaar Seeding Issue)
बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेला जोडलेले असते, पण ते ‘NPCI मॅपर’शी (डीबीटीसाठी) लिंक नसते. शासनाचा ५ हजारांचा निधी हा थेट आधार बेस्ड पेमेंट सिस्टीमने (ABPS) पाठवला जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे खाते डीबीटी इनॅक्टिव्ह आहे, त्यांचे व्यवहार बँक स्तरावर ‘Failed’ किंवा ‘Pending’ म्हणून अडकले असू शकतात.
२. ‘ॲग्रीस्टॅक’ फार्मर आयडी (Farmer ID) पडताळणी प्रलंबित
शासनाने दुष्काळी आणि नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासाठी ‘ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र’ अनिवार्य केले आहे. महसूल व कृषी विभागाच्या यादीतील नावांची पडताळणी फार्मर आयडीशी जुळली नाही, तर अशा शेतकऱ्यांची नावे अंतिम बिलिंग यादीतून बाजूला काढली जात आहेत.
३. टप्प्याटप्प्याने होणारे क्लिअरन्स (Lot System):
शासनाने एकाच दिवशी ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवल्याचे जाहीर केले असले, तरी संबंधित बँकांच्या सर्व्हरवर लोड आल्यामुळे हा निधी ‘लॉट सिस्टीम’नुसार जमा केला जात आहे. त्यामुळेच एकाच गावातील काही शेतकऱ्यांना मेसेज आला असून त्याच गावातील काही शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे.
४. बँक खात्यातून परस्पर जुन्या कर्जाची वसुली झाली का?
शासनाने बँकांना सक्त ताकीद दिली आहे की, आपत्ती मदतीचा निधी कोणत्याही जुन्या कर्जापोटी किंवा व्याजापोटी वळती (Hold/Deduct) करता येणार नाही. तरीही काही बँकांमध्ये खात्यातील मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे किंवा थकीत कर्ज खात्यामुळे एसएमएस न येता परस्पर अंतर्गत समायोजन झाले आहे का, हे शेतकऱ्यांनी पासबुक प्रिंट करून तपासणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी आता काय करावे?
- बँकेत जाऊन एनपीसीआय (NPCI Link) स्टेटस तपासा: आपले आधार बँक खात्याशी डीबीटीसाठी सक्रिय आहे का याची खात्री करा.
- दुसरे बँक खाते तपासा: जर आपले एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते असेल, तर ज्या खात्याला आधार सर्वात शेवटी लिंक झाले आहे, त्या खात्यावर रक्कम जमा झाली असू शकते.
- ग्रामसेवक किंवा तलाठ्यांशी संपर्क: दुष्काळी अनुदानाच्या गावनिहाय यादीत (Beneficiary List) आपले नाव मंजूर यादीत समाविष्ट आहे की त्रुटींमध्ये गेले आहे, याची खात्री स्थानिक महसूल विभागाकडून करून घ्या.
प्रशासनाच्या दाव्यानुसार तांत्रिक त्रुटींची पूर्तता झालेल्या उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील दोन दिवसांत हे पैसे वर्ग केले जातील, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष हातात पैसा कधी पडणार, याकडेच आता बळीराजाचे डोळे लागले आहेत.
📢 महाराष्ट्रातील नवीन सरकारी योजना, शासन निर्णय (GR), हवामान अंदाज, शेतमाल बाजारभाव आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



