Maharashtra Cabinet Decisions | मुंबई : राज्याच्या विकास, आरोग्य व न्याय व्यवस्थेच्या उन्नतीसाठी आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा थेट परिणाम नागरिक, शेतकरी तसेच औद्योगिक क्षेत्रावर होणार आहे.
कर्करोग उपचारासाठी महाकेअर फाऊंडेशन
राज्यातील नागरिकांना दर्जेदार कर्करोग उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी “महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन)” या संस्थेच्या स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे. या फाऊंडेशनसाठी १०० कोटी रुपयांचे भागभांडवल निश्चित करण्यात आले आहे.
जागतिक क्षमता केंद्र धोरण २०२५
महाराष्ट्र ‘ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर (GCC)’ व्हावा यासाठी “जागतिक क्षमता केंद्र धोरण २०२५” मंजूर करण्यात आले. या धोरणामुळे राज्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीला चालना मिळेल आणि विकसित भारताच्या दिशेने वाटचाल अधिक सुसंगत होईल.
सौर कृषीपंपासाठी निधी
औद्योगिक, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजना व इतर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार आहे.
महाजिओटेक महामंडळ स्थापन
प्रशासनात भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा (Geospatial Technology) प्रभावी वापर व्हावा यासाठी “महाजिओटेक महामंडळ” स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे धोरणात्मक नियोजन व निर्णय प्रक्रियेला गती मिळणार आहे.
फलटण येथे वरिष्ठ न्यायालय
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या न्यायालयासाठी आवश्यक पदनिर्मिती व खर्चाच्या तरतुदीही मंजूर करण्यात आल्या.



