सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला एकाच धाग्यात बांधणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गा’बाबत (Nagpur-Goa Shaktipeeth Expressway) नवीन माहिती समोर आली आहे. सध्या नागपूरहून गोव्याला जायचे म्हटले तर गाडीने तब्बल १८ ते २१ तास वेळ लागतो. मात्र, हा प्रस्तावित ८५६ किलोमीटरचा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हाच पल्ला अवघ्या ७ ते ८ तासांत पार करता येणार आहे.
हा महामार्ग केवळ नागपूर-गोवा जोडणारा नसून, राज्यातील प्रमुख २१ धार्मिक आणि पर्यटन स्थळांना थेट जोडणारा एक मोठा कॉरिडॉर ठरणार आहे.
२१ तीर्थक्षेत्रे थेट एकाच मार्गावर
या प्रकल्पाला ‘शक्तिपीठ’ नाव देण्यामागचे कारण म्हणजे राज्यातील महत्त्वाची मंदिरे या रस्त्याने जोडली जातील. यामध्ये:
- माहूरची रेणुका माता
- तुळजापूरची तुळजाभवानी
- कोल्हापूरची महालक्ष्मी (अंबाबाई)
या तीन प्रमुख शक्तिपीठांशिवाय औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, नृसिंहवाडी आणि पंढरपूर यांसारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्रेही या मार्गाच्या जवळ असणार आहेत. त्यामुळे भाविकांचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांना पर्यटनातून मोठा फायदा होईल.
हेही वाचा: पाडव्याच्या मुहूर्तावर सराफा बाजारात मोठी तेजी! पहा आजचे सोन्याचे दर, १० नोव्हेंबर २०२६.
१३ जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग
हा द्रुतगती मार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांमधून जाणार आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागांना थेट गोव्याच्या सीमेशी जोडले जाईल. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी व उद्योजकांना आपला माल कोकणातील बंदरांपर्यंत आणि गोव्याच्या बाजारपेठेत कमी वेळेत पोहोचवणे यामुळे शक्य होणार आहे.
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच काम होणार
पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील काही भागांत सुपीक शेतजमीन या प्रकल्पात जाणार असल्यामुळे सुरुवातीपासून शेतकऱ्यांचा या रस्त्याला विरोध राहिला आहे. यावर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि योग्य मोबदल्याची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय जबरदस्तीने काम पुढे नेले जाणार नाही. सध्या बाधित भागांमध्ये मोजणीचे काम टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे.
📢 महाराष्ट्रातील नवीन सरकारी योजना, शासन निर्णय (GR), हवामान अंदाज, शेतमाल बाजारभाव आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



