Sangli Airport News | सांगली : जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे कार्गो व नागरी विमानतळ उभारणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सांगली विमानतळ प्रकल्पाच्या प्रलंबित मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीदरम्यान मौजे कवलापूर येथे विमानतळ उभारणीसाठी उपलब्ध जागा पूरक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच अतिरिक्त जागेची आवश्यकता असल्यास ती अधिग्रहण करून देण्याची तयारी राज्य सरकारकडून दर्शविण्यात आली.
सांगली व मिरज परिसर औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय व शेती व्यवसायासाठी देश-विदेशातून लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असलेला विभाग आहे. त्यामुळे विमानतळ उभारणीमुळे वाहतुकीला गती मिळून औद्योगिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सर्व प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा पुढील बैठक होणार आहे.
हेही वाचा: महत्त्वाचे निर्णय जाहीर – कर्करोग उपचार धोरण, महाजिओटेक महामंडळ, फलटण येथे वरिष्ठ न्यायालय.